Dhuliya – Wahid kakar@9421532266
मालेगावहून धुळे शहरात मानवी आरोग्यास अत्यंत घातक असलेली ऑक्सिटोसिनसदृश इंजेक्शन्सची चोरटी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकाला मोहाडी नगर पोलिसांनी सापळा रचून रात्री आठच्या सुमारास रंगेहाथ पकडले. संशयित रिक्षाचालकाजवळ तब्बल १,८९० इंजेक्शनच्या बॉटल्स व सुमारे ८७,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुप्त माहिती, आणि तत्काळ सापळा
२२ जुलै रोजी मोहाडी नगर पोलिस उपनिरीक्षक नितीन करंडे यांना पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी गुप्त माहितीवरून सूचित केले की, मालेगाव येथून एका रिक्षाद्वारे अवैध औषधांची वाहतूक केली जात आहे. माहितीच्या आधारे अवधान गावाच्या फाट्यावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ वर सापळा रचण्यात आला.
रात्री ८ च्या सुमारास रिक्षा (MH-41 B-3459) आल्यानंतर पोलिसांनी रिक्षाचालक अब्दुल सलाम निसार अहमद (वय ५६, रा. गुलशेर नगर, मालेगाव) याला ताब्यात घेतले. रिक्षामध्ये १० बॉक्समध्ये भरलेले ८० मि.ली. मापाचे एकूण १८९० पांढऱ्या रंगाच्या, नाव नसलेल्या बॉटल्स आढळून आल्या.
मानवी आरोग्यास गंभीर धोका
सदर बॉटल्समध्ये संभाव्य ऑक्सिटोसिन इंजेक्शन असल्याचा संशय असून, हे औषध म्हशींना पाणविण्यासाठी वापरले जाते. मात्र, याचा परिणाम स्त्रियांमध्ये वंध्यत्व, गर्भपात, मुलांमध्ये कॅन्सर, काविळ, पोटाचे विकार, त्वचारोग व श्वसनाचे आजार अशा गंभीर स्वरूपात होतो. त्यामुळे यावर कायद्याने बंदी असून, वाहतूक करणे हे गुन्हेगारी स्वरूपाचे आहे.
गुन्हा दाखल, तपास सुरू
या प्रकरणी पोलिसांनी रिक्षाचालकाविरुद्ध भादंवि कलम 123, 210, 274, 276 आणि प्राण्यांवरील छळ प्रतिबंध अधिनियम 11(1)(ग), 12 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोउनि. नितीन करंडे करत आहेत.
संपूर्ण कारवाई या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. शिल्पा पाटील, पो.उपनि. नितीन करंडे, पोहवा. पंकज चव्हाण, पोकॉ. रमेश शिंदे, पोकॉ. चेतन झोळेकर आदींनी केली.