रिपोर्टर नूरखान
अमळनेर – सौहार्द, सेवाभाव आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या ईद-ए-मिलादुन्नबी या पवित्र दिनाचे औचित्य साधून अमळनेर शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, अमळनेर येथे भरविण्यात आलेल्या या शिबिराला शहरातील नागरिकांनी विशेषत युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सामाजिक बांधिलकी जपली.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन अमळनेर तालुक्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी (SDPO) विनायक कोते आणि पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी समाजाने घेतलेल्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले आणि अशा प्रकारच्या शिबिरांमधून समाजात ऐक्य, सेवा आणि सकारात्मकतेचा संदेश पसरतो असे प्रतिपादन केले.
या शिबिरात रियाज मौलाना, सत्तार मास्टर, फयाज पठाण, शकील काझी, डॉ. एजाज रंगरेज, नरेंद्र संदानशिव, अजहर शेख, नाविद शेख, शेखा हाजी यांच्यासह मुस्लिम समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते. विविध सामाजिक संघटना, तरुण मंडळी आणि नागरिकांनी यामध्ये सहभागी होत रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित केले.
शिबिरात गोळा करण्यात आलेल्या सर्व रक्तपिशव्या ‘जीवनश्री रक्त केंद्र, अमळनेर’ येथे जमा करण्यात आल्या, व या केंद्राचे डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांनी संपूर्ण शिबिराच्या यशस्वी आयोजनात मोलाचे सहकार्य केले. मुस्लिम समाजातर्फे जीवनश्री रक्तकेंद्राच्या सर्व कर्मचाऱ्यांचे आणि डॉक्टरांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
ईद-ए-मिलादुन्नबीचा खरा अर्थ म्हणजे प्रेम, दया, सेवा आणि मानवतेचा प्रसार – आणि या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून मुस्लिम समाजाने त्या मूल्यांची सजीव प्रचिती घडवून आणली. समाजातील एकोपा आणि ऐक्य वृद्धिंगत करणाऱ्या अशा उपक्रमांमुळे अमळनेर शहरात सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.