अमळनेर – शहरातील इस्लामपुरा परिसरात गुरुवारी रात्री गणपती बाप्पाचे विसर्जन मोठ्या उत्साह आणि भक्तिभावाने पार पडले. विविध मंडळांनी पारंपरिक वाद्यांच्या गजरात, ढोल-ताशांच्या निनादात आणि गुलालाच्या उधळणीत बाप्पाला निरोप दिला. मात्र, मिरवणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणावर फेकण्यात आलेल्या गुलालामुळे परिसरात अस्वच्छता निर्माण झाली होती.
दुसऱ्या दिवशी, शुक्रवार असल्याने मुस्लिम बांधवांसाठी हा विशेष महत्त्वाचा दिवस होता. नमाज पठणासाठी मोठ्या संख्येने नागरिक मशीदीत जातात. त्यातच याच दिवशी हजरत मोहम्मद पैगंबर साहब यांचा जन्मदिवस (ईद-ए-मिलाद / मिलाद उन-नबी) असल्यामुळे धार्मिकदृष्ट्या परिसर स्वच्छ असणे अत्यावश्यक होते.
ही बाब लक्षात घेऊन अमळनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी तत्काळ पावले उचलत स्वच्छता विभागाला निर्देश दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक किरण कंडारे, तसेच कर्मचारी संतोष माणिक मुकादम, गौतम मोरे, नितीन बिर्हाडे यांच्यासह पथकाने शुक्रवार सकाळपासून इस्लामपुरा भागात व्यापक स्वच्छता मोहीम राबवली.
या पथकाने रस्ते, गल्ल्या, सार्वजनिक ठिकाणांवर साचलेला गुलाल, धूळ आणि कचरा पूर्णतः साफ केला. परिसरात पाणी मारून धूळ खाली बसवली गेली. आरोग्य विभागाच्या तत्पर आणि जबाबदारीपूर्ण कार्यामुळे परिसर पुन्हा स्वच्छ व स्वच्छतादर्शक झाला. यामुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
इस्लामपुरा भागातील मुस्लिम समाजबांधवांनी नगरपालिकेच्या या तत्काळ आणि सकारात्मक कारवाईचे विशेष कौतुक केले असून, मुख्याधिकारी तुषार नेरकर व संपूर्ण स्वच्छता पथकाचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
या संपूर्ण प्रसंगातून शहरातील सर्व धर्मीय समुदायांनी आपापले सण-उत्सव शांततेत व सौहार्दपूर्ण वातावरणात साजरे करून सामाजिक सलोखा जपल्याचे अधोरेखित होते. धार्मिक विविधता असूनही, परस्पर सहकार्य आणि समजूतदारपणाचा आदर्श अमळनेरवासीयांनी पुन्हा एकदा दाखवला आहे.