रिपोर्टर नूरखान
अमळनेर, दि. १७ सप्टेंबर २०२५ — केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत आणि केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालय (MoHUA) यांच्या निर्देशानुसार “स्वच्छता ही सेवा” अभियानाचा शुभारंभ आज अमळनेर शहरात नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात आला.
या अभियानांतर्गत आयुडीपी शॉपिंग कॉम्प्लेक्स, साने गुरुजी पुतळा परिसर, बस स्थानक, बालेमिया परिसर, तसेच धुळे रस्ता, पिंपळे रस्ता, ढेकू रस्ता आदी ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून एकूण ५.५ टन कचरा संकलित करून योग्य विल्हेवाट लावण्यात आली.
स्वच्छता अभियानाचे नेतृत्व अमळनेर नगरपरिषदेचे प्रशासक व मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी केले. यावेळी स्वच्छता निरीक्षक किरण कंडारे व संतोष माणिक, शहर समन्वयक गणेश गढरी, प्रभागांतील मुकादम, सफाई कर्मचारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ दरम्यान संपूर्ण शहरात स्वच्छता ही सेवा अभियानाचे विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. यामध्ये शाळा, महाविद्यालये, शासकीय व निमशासकीय कार्यालये, सामाजिक संस्था, व्यापारी संघटना, पत्रकार, नगरसेवक तसेच सर्वसामान्य नागरिकांचा सक्रिय सहभाग अपेक्षित आहे.
अमळनेर शहराला स्वच्छ, सुंदर व हरित बनविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने सहभागी व्हावे, असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाकडून करण्यात आले आहे.