अमळनेर :- अमळनेरनांसाठी अत्यंत आनंदाची व स्वागतार्ह बातमी! चेन्नई–जोधपूर एक्सप्रेस (गाडी क्र. 22663/22664) या दीर्घ पल्ल्याच्या महत्त्वाच्या रेल्वेला आता अमळनेर रेल्वे स्थानकावर अधिकृत थांबा मिळाला आहे हा थांबा अमळनेर व आजूबाजूच्या परिसरातील विद्यार्थी, व्यापारी, नोकरदार व सामान्य प्रवासी वर्गासाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. या निर्णयामुळे राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि तामिळनाडू या राज्यांमधील प्रवास आता अधिक सुलभ व सहज होणार आहे.
जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिता वाघ यांच्या सातत्यपूर्ण आणि प्रभावी पाठपुराव्यामुळे हा निर्णय शक्य झाला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांनी रेल्वे मंत्रालयाशी सातत्यानं पत्रव्यवहार केला आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधत अमळनेरकरांच्या गरजांवर ठामपणे भाष्य केलं.
रेल्वेमंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांनी खासदार वाघ यांच्या निवेदनास सकारात्मक प्रतिसाद देत अधिकृत पत्राद्वारे थांब्याची मान्यता दिली, याबद्दल अमळनेर व परिसरात समाधानाचे व उत्साहाचे वातावरण आहे. खासदार स्मिता वाघ म्हणाल्या, “हा केवळ एका गाडीचा थांबा नाही, तर अमळनेरच्या सर्वांगीण विकासाचा मैलाचा दगड आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी आणखीही प्रयत्न सुरूच राहतील.” या सकारात्मक निर्णयाबद्दल अमळनेरकरांकडून विशेषतः खासदार स्मिता वाघ यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात येत आहेत.