रिपोर्टर नूरखान
अमळनेर :-स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली सेवा पंधरवडा अंतर्गत ‘स्वच्छोस्तव – स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमाचा अमळनेर नगर परिषदेमार्फत उत्साहात प्रारंभ करण्यात आला.
या उपक्रमाची सुरुवात आज सकाळी १० ते ४ दरम्यान ग्रामीण रुग्णालय, अमळनेर येथे आयोजित आरोग्य शिबिराने झाली. यामध्ये नगर परिषदेतील NULM बचत गटांच्या महिला, स्वच्छता विभागातील सफाई कर्मचारी, मुकादम तसेच प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी यांनी सहभाग घेत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.
त्यानंतर सकाळी ११ वाजता “छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबीर” आयोजित करण्यात आले. यावेळी खासदार श्रीम. स्मिताताई वाघ यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ५ लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात घरकुलाच्या चाव्या वाटप करण्यात आल्या. याच कार्यक्रमात ५ लाभार्थ्यांना घरबांधणी परवानग्या, तर ३ महिला बचत गटांना १९ लाख रुपयांचा निधी दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत प्रदान करण्यात आला. यावेळी प्रधानमंत्री सूर्य घर योजनेबाबत नागरिकांना मार्गदर्शनही करण्यात आले.
दुपारी २ वाजता धुळे रोडवरील रवी नगर येथील ओपन स्पेस आणि साने गुरुजी उड्डाणपुल परिसरात एकूण ७५ झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपणात खासदार स्मिताताई वाघ, माजी नगराध्यक्ष भैरवीताई पलांडे, नगर परिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी तुषार नेरकर व डॉ. अनिल शिंदे यांचा सहभाग होता.
यानंतर अमळनेर बसस्थानक परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मान्यवरांनी स्वतः झाडू हाती घेत परिसरातील सफाई करून जनतेसमोर स्वच्छतेचा आदर्श ठेवला.
या उपक्रमात उपमुख्याधिकारी रविंद्र चव्हाण, अभियंता सुनील पाटील, पाणीपुरवठा अभियंता प्रवीण बैसाणे, स्वच्छता निरीक्षक किरण कंडारे, संतोष माणिक यांच्यासह नगर परिषदेचे विविध विभागप्रमुख, प्रभाग मुकादम, सफाई कर्मचारी, महिला हौसिंग ट्रस्टच्या पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
स्वच्छता ही सेवा अभियान १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ दरम्यान राबविण्यात येणार असून, अमळनेर शहरातील नागरिक, संस्था, शाळा, कार्यालये, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकारांनी या अभियानात स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन शहर स्वच्छ, सुंदर व हरित ठेवावे, असे आवाहन खासदार स्मिताताई वाघ, मुख्याधिकारी तुषार नेरकर आणि डॉ. अनिल शिंदे यांनी यावेळी केले.