रिपोर्टर नूरखान
अमळनेर – तालुक्यात अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीचा धुमाकूळ सुरू असून, शहरासह ग्रामीण भागात पहाटेपासून ट्रॅक्टरद्वारे वाळूची वाहतूक सर्रास केली जात आहे. मांडळ, झाडी, शिरसाळे, कलंबू या गावांमध्ये पहाटेच्या सुमारास वाळूने भरलेले ट्रॅक्टर बिनधास्तपणे वाहतूक दिसून येत आहेत.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या वाळू माफियांना स्थानिक प्रशासनातील काही व्यक्तींचे मूक समर्थन असल्याचा आरोप आहे. तलाठी, कोतवाल, पोलीस पाटील यांच्याकडून दुर्लक्ष केल्यामुळे वाळू माफियांचे फावले असून महसूल यंत्रणेचे कार्यक्षमता प्रश्नचिन्हास्पद बनली आहे.
विशेषत शहरात सकाळी लवकरच वाळूने भरलेली वाहने खुले आम वाहतूक आढळून येतात. ग्रामीण भागातून वाळू काढून शहरात आणली जात असून त्यावर कुठलाही ठोस बंदोबस्त दिसत नाही. काही तलाठी व संबंधित अधिकाऱ्यांकडून हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून महसूल आणि पोलिस प्रशासनाकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. वाळू उपशामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडतो असून, ग्रामपंचायतच्या हद्दीतून अवैध वाळू नेली जात असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांना आर्थिक नुकसानही होत आहे.
या सर्व प्रकारांवर संबंधित तहसीलदार, मंडळ अधिकारी, व पोलीस प्रशासन काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वाळू माफियांवर कठोर कारवाई होणार का? की नेहमीप्रमाणे प्रकरण थंडबस्तात टाकले जाणार? हा खरा प्रश्न आहे.