रिपोर्टर नूरखान
अमळनेर:- तालुक्यातील भरवस मंडळ अंतर्गत येणाऱ्या पाडसे, चौबारी, जैतपीर, भोरटेक सह इतर गावांमधील महसूल विभागाने जाहीर केलेली हंगामी पैसेवारी अत्यंत अवाढव्य असून, यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थांनी केला आहे. त्यांनी या संदर्भात तहसीलदारांना निवेदन सादर करून तातडीने पैसेवारी कमी करण्याची मागणी केली आहे.
निवेदनानुसार, चालू वर्षात जुलै २०२५ ते ऑगस्ट २०२५ या ३० दिवसांच्या काळात पाऊस न झाल्याने कापूस, मका, सोयाबीन, ज्वारी, बाजरी तसेच उडीद, मूग यासारखा संपूर्ण खरीप हंगाम हातातून गेला आहे. सुरुवातीला पावसाचा खंड आणि त्यानंतर ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यानंतर आलेल्या पावसामुळे कापूस पिकावर ‘लालण्या’ रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. यामुळे कापसाचे पीकही मोठ्या प्रमाणात नुकसानीत आले आहे.
भरपाईऐवजी जास्तीची पैसेवारी लादल्याचा आरोप,
शेतकऱ्यांनी यावर्षी दुहेरी संकटाचा सामना केला असून, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असतानाही शासनाने शेतकऱ्याला कोणतीही नुकसानभरपाई न देता उलट जास्तीची हंगामी पैसेवारी लादली असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले असतानाही जास्त पैसेवारी जाहीर झाल्यामुळे शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची भीती आहे. त्यामुळे, प्रशासनाने वस्तुस्थितीची नोंद घेऊन अमळनेर तालुक्यातील हंगामी पैसेवारी तातडीने कमी करून शेतकऱ्यानां दिलासा द्यावा व सहकार्य करावे, अशी विनंती सदर निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.