रिपोर्टर नूरखान
अमळनेर (प्रतिनिधी) – शहरातील कचरा संकलन व्यवस्थेची अवस्था अत्यंत बिकट झाली असून, नागरिकांना घरात कचरा साठवण्याची वेळ आली आहे. सध्या अमळनेर नगरपरिषदेकडे केवळ १८ घंटागाड्या आणि ६० कर्मचारी असूनही, त्यापैकी काही गाड्या नादुरुस्त अवस्थेत गॅरेजमध्ये लावण्यात आल्या आहेत तर काही धुळखात पडल्या आहेत. त्यामुळे अनेक प्रभागांत घंटागाड्या वेळेवर येत नाहीत, परिणामी नागरिक संतप्त आहेत.
शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून, विशेषतः नवीन वसाहतींमध्ये रस्त्यांवर आणि चौकांत दुर्गंधी पसरली आहे. पावसाळ्यामुळे डासांचा प्रकोप वाढला असून, साथीचे आजार डोके वर काढू लागले आहेत.
नाशिकच्या ठेकेदारावर गंभीर आरोप.
शहरातील कचरा संकलनाचा ठेका नाशिकमधील मे. एस.आर. ग्रीनवे एम्पायर कंपनीकडे असून, गेल्या काही वर्षांपासून कोणतीही निविदा प्रक्रिया न करता त्यांनाच वारंवार मुदतवाढ दिली जात आहे. कोरोनाच्या काळापासून सुरू असलेला हा ठेका जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दिला गेला असून, यामागे मोठ्या प्रमाणावर मिलीभगत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
कोण घेतो ठेकेदाराचे लाड?
प्रश्न असा उपस्थित होतो की, एवढी कुचकामी सेवा असूनही हा ठेकेदार वारंवार निवडला कसा जातो? पालिका प्रशासन त्याला अभय का देते? यावर लोकप्रतिनिधी, नगरसेवक आणि राजकीय नेते गप्प का आहेत? दर महिन्याला लाखो रुपयांची रक्कम खर्च करूनही शहराची स्वच्छता नाहीशी झाली आहे, हे अत्यंत गंभीर स्थितीचे द्योतक आहे.
घंटागाड्यांची अवस्था गंभीर.
काही घंटागाड्या नादुरुस्त असून, त्यांचे चालक घरी बसून पगार घेत आहेत का, असा संशय नागरिक व्यक्त करत आहेत. या गाड्यांचे ऑडिट होणे आवश्यक आहे. गाड्या कोणत्या गॅरेजमध्ये आहेत, किती चालू आहेत आणि किती निष्क्रिय आहेत याचा खुलासा पालिकेने करावा, अशी मागणी जोर धरत आहे.
मुख्याधिकाऱ्यांचे आश्वासन.
“कचरा संकलन ठेक्याची मुदतवाढ लवकरच संपत आहे. नव्या ठेक्यासाठी ई-निविदा प्रक्रिया सुरू झाली असून काही दिवसांत टेंडर प्रसिद्ध केले जातील.”
— तुषार नेरकर, मुख्याधिकारी, अमळनेर नगरपरिषद
नागरिकांचा सवाल – कारवाई कधी?