अमळनेर (प्रतिनिधी) नूरखान
अमळनेर शहर आणि परिसरात वाळूच्या ओव्हरलोड गाड्यांमुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून, नागरिकांना दररोज प्रवास करताना जीव मुठीत घेऊन चालावं लागत आहे. डंपर आणि ट्रॅक्टर क्षमतेपेक्षा जास्त वाळू भरून धावू लागले असून, त्यामुळे शहरातील आणि ग्रामीण भागातील रस्त्यांवर मोठाले खड्डे पडले आहेत. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून, प्रदूषणाचाही मोठा प्रश्न उभा राहिला आहे.
चोपडा रोड, धुळे रोड सर्वाधिक धोकादायक
विशेषतः चोपडा रोड आणि धुळे रोड या मुख्य रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. पावसाळ्यात खड्डे पाण्याखाली झाकले जात असल्याने वाहनचालकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. या ठिकाणी अपघातांचे प्रमाण वाढले असून, अनेक नागरिक किरकोळ ते गंभीर जखमी होत आहेत.
प्रशासनाचे दुर्लक्ष, नागरिकांत संताप.
स्थानिक नागरिकांनी महसूल विभाग आणि पोलिस प्रशासनावर जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. वाळू वाहतुकीसाठी नियम असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. कायद्याप्रमाणे, मर्यादित वेळेत आणि वजनातच वाळू वाहतूक व्हावी लागते, मात्र अमळनेरमध्ये दिवसाढवळ्या अवैध वाहतूक सुरू आहे.
प्रदूषण आणि आरोग्याचा प्रश्नही गंभीर.
या अवजड वाहनांमुळे उडणारी धूळ परिसरात प्रदूषण निर्माण करत आहे. लहान मुले, वृद्ध आणि श्वासाच्या त्रासाने ग्रस्त नागरिक यांना याचा मोठा त्रास होत आहे.
तातडीने कारवाईची मागणी.
नागरिकांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की जर लवकरच कठोर कारवाई झाली नाही, तर तीव्र आंदोलन करण्यात येईल. खराब रस्त्यांची डागडुजी, अवैध वाळू वाहतुकीवर बंदी झाली पाहिजे.