गरीब कुटुंबातून शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षेत नेत्रदीपक यश.
अमळनेर :- जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाच्या जोरावर गरीब कुटुंबातील होतकरू मुलगा सैय्यद नूरअली कचरोदिन याने थेट स्टेट रिजर्व पोलीस फोर्स (SRPF) मध्ये भरती होऊन संपूर्ण समाजासमोर एक प्रेरणादायी आदर्श ठेवला आहे.
गरिबीशी झुंज देत घडले यश.
अमळनेर शहरातील मिल चाल या भागात नूरअलीचा जन्म अतिशय गरीब मजुराच्या कुटुंबात झाला. वडिलांचे निधन त्याच्या लहानपणीच झाले होते. तीन भावांमध्ये मोठा भाऊ नईम कुटुंबाची जबाबदारी पेलत एका खाजगी रुग्णालयात कंपाउंडर म्हणून कार्यरत राहिला. घरातील हालाखीची परिस्थिती असूनही नईमने धाकट्या भावाच्या शिक्षणाची जबाबदारी सांभाळली.
नूरअलीचे प्राथमिक शिक्षण प्रताप हायस्कूल मध्ये झाले, तर पुढे त्याने प्रताप महाविद्यालयातून बी.ए. पूर्ण केले. शिक्षणासोबतच तो कधी रसवंतीगृहात तर कधी छोट्या-मोठ्या कामांमधून घरखर्चाला हातभार लावत होता.
ध्येयाप्रती प्रामाणिक परिश्रम.
२०२० मध्ये तो होमगार्ड म्हणून सेवेत दाखल झाला. काही महिन्यांत MSF मुंबई मध्ये भरती झाला आणि तेथून पुढे परिश्रमांची कास धरून अखेर SRPF मध्ये निवड झाली. अडचणींचा पर्वा न करता घेतलेली झुंज त्याला यशस्वी करून गेली.
आईच्या डोळ्यात आनंदाश्रू.
नूरअलीच्या यशामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. मुलगा SRPF मध्ये भरती झाल्याची बातमी कळताच आईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. मोठा भाऊ नईमलाही अभिमान वाटला. गरीबीतून जिद्दीने उभा राहिलेला हा मुलगा आज सर्व समाजासाठी प्रेरणादायी ठरला आहे.
समाजासाठी अभिमानाचा क्षण.
गरीब घरातून मुस्लिम समाजातील एक होतकरू तरुण अधिकारी पदावर पोहोचला, हा संपूर्ण समाजासाठी अभिमानाचा क्षण आहे. नूरअलीचे कार्य व मेहनत आज तरुणाईसाठी प्रेरणादायी संदेश देऊन जात आहेत.
यश सैनिकांना समर्पित.
नूरअलीने आपल्या यशाचे श्रेय आई, मोठा भाऊ, गुरुजन, मित्र तसेच देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद जवानांना दिले. “ध्येय डोळ्यांसमोर ठेवा आणि त्यासाठी अहोरात्र परिश्रम घ्या, यश नक्कीच मिळेल,” हा संदेश तो आपल्या जीवनातून देतो.