अमळनेर : तालुक्यातील अमळगाव येथील मरीमाता मंदिराच्या मागील भिल्ल वस्तीचे चिखली नदीच्या पूरामुळे दरवर्षी होणारे नुकसान व संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी पूरग्रस्त वस्तीचे पुनर्वसन पूररेषेच्या वरील उंच जमिनीवर करावे, अशी मागणी अमळगाव येथील पूरग्रस्तांनी केली आहे.
याबाबत एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य अमळनेर तालुका अध्यक्ष श्री गुलाब बोरसे अमळनेर तालुका अध्यक्ष आबा बहिरम अमळनेर तालुका उपाध्यक्ष सल्लागार भगवान संदानशिव सामाजिक कार्यकर्ते विकास सोनवणे अमळनेर शहर अध्यक्ष सुधाकर पवार जळगाव जिल्हा सल्लागार विनायक सोनवणे अशांनी
प्रांताधिकारी, तहसीलदार, बीडीओ यांच्यासह आमदार, खासदार व मंत्रीमंडळाला निवेदन सादर करण्यात आले आहे. निवेदनात नमूद आहे, की दरवर्षी गावातील भिल्ल वस्ती पाण्याखाली जात असल्याने अतोनात नुकसान होते. १७ ऑगस्ट रोजी वस्ती जलमय झाली असून संसारपयोगी साहित्यासह घरांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी टळली आहे.
सन २००६ मध्ये चिखली नदीला आलेल्या महापूरात भिल्ल वस्ती वाहून गेली होती. तत्कालिन जिल्हाधिकारी सिंघल यांनी प्रत्यक्ष भेट देत पूरग्रस्तांना नवीन सुरक्षित ठिकाणी घरे व भरपाईबाबत आदेशित केले होते. यानंतर ग्रामपंचायतीच्या वतीने मरीमाता मंदिराच्या मागील बाजूस घरकुलांसाठी जागा दिली. मात्र हा परिसरसुद्धा पुररेषेत येत असल्याने कायमस्वरूपी धोका आहे. त्यामुळे पूरग्रस्त वस्तीचे पुनर्वसन पूररेषेच्या वरील उंच जमिनीवर करावे. तसेच १७ ऑगस्ट रोजी झालेल्या नुकसानीबाबत तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.
संरक्षण भिंतीचे गौडबंगाल
अमळगावात प्रवेशासाठी एकमेव रस्ता असून तो पूररेषेला खेटून आहे. प्रत्येक पावसाळ्यात हा मुख्य रस्ता आणि नजीकची भिल्ल वस्ती पाण्याखाली जाते. त्यामुळे अमळगावसह आमदारांचे गाव हिंगोणे, दोधवद, निंभोरा, कलाली, सात्री आदी गावांचा संपर्क तुटतो. या पूर्वी अनेकदा संरक्षण भिंत आणि धक्का बांधण्यात आलेला आहे. मात्र यापैकी काही भिंती या चालत्या असून त्या केवळ कागदावरच आहेत. त्यामुळे संरक्षण भिंतींवर वायफळ खर्च नकोच असे ग्रामस्थांचे म्हणने आहे.
स्मशानभूमी नदीपात्रात
२५ वर्षांपूर्वी तत्कालिन सरपंच(योगायोग आत्ताचे तेच विद्यमान सरपंच आहेत) गिरीश पाटील हे स्वत: बांधकाम इंजिनिअर असताना त्यांनी नदीच्या धारेत स्मशानभूमी बांधली, हे विशेष. स्मशानभूमी, संरक्षण भिंती, धक्का, डायमंड बंधारे आदी पाण्याच्या नावाने उपक्रमांवरील पैसा चांगलाच जिरला आणि मूरला आहे. अलीकडील काळात तत्कालिन आमदार शिरीष चौधरी यांनी नव्या स्मशानभूमीसाठी निधी उपलब्ध करून दिला. मात्र ही स्मशानभूमीसुद्धा पूररेषेलगत असल्याने पाण्याखाली गेली आहे.