जळगाव | प्रतिनिधी
जळगाव :- शहरात शनिवारी सकाळी एक धक्कादायक घटना समोर आली. बिलाल चौकातून दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या 21 वर्षीय युवक अबुझर शेख युनूस याचा मृतदेह मेहरून तलावात संशयास्पद अवस्थेत आढळून आला. ही घटना 20 सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
दोन दिवसांपासून बेपत्ता.
अबुझर शेख युनूस हा युवक दोन दिवसांपासून बेपत्ता होता. कुटुंबीयांनी नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिसरात सर्वत्र शोध घेतला. कोणताही ठोस मागोवा न लागल्याने त्यांनी MIDC पोलीस ठाण्यात बेपत्ता व्यक्तीची तक्रार दाखल केली होती.
शव सापडताच खळबळ.
शनिवारी सकाळी जय सपकाळे नामक नागरिकाने मेहरून तलावामध्ये एक मृतदेह तरंगताना पाहिला. त्याने तत्काळ पोलिसांना कळवले. पोलिसांनी रवी हटकर यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला असता, तो अबुझर शेख युनूस याचाच असल्याचे निष्पन्न झाले. मृतदेह सडलेला नसल्याने त्याचा मृत्यू अलीकडील काळात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
कुटुंबीयांचा आक्रोश आणि संशय.
मृतदेह पाहून कुटुंबीयांनी जोरदार आक्रोश केला आणि मृत्यूवर संशय व्यक्त केला. त्यांच्या मते, तलावामध्ये जर डूबून मृत्यू झाला असता, तर मृतदेह 24 तासांत वर आला असता. मात्र, अबुझरचा मृतदेह दोन दिवसांनंतर सापडल्याने आणि तो संशयास्पद अवस्थेत असल्याने, हत्या झाल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.
पोलीस तपास सुरू.
MIDC पोलिसांनी घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून केली आहे. मात्र, परिस्थिती पाहता हत्या किंवा अन्य गुन्हेगारी पार्श्वभूमी असण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण समोर येईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
मुलाचे गूढ मृत्यूमुळे शहरात खळबळ; सत्य बाहेर येण्याची कुटुंबीयांची मागणी.
अबुझरच्या मृत्यूने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कुटुंबीयांनी या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करून गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.