रिपोर्टर नूरखान
अमळनेर : – मारवड (ता. अमळनेर) येथील ग्रामपंचायतीमध्ये सत्तेचा दुरुपयोग करून अपंग नागरिकावर अन्याय केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. योगेश उत्तम पाटील (रा. मारवड), ६२% अपंग असलेल्या नागरिकाने उपसरपंच बाबूराव दोलत पाटील, त्यांचा मुलगा, माजी सरपंच उमेश रामकृष्ण साळुंखे आणि ग्रामपंचायत क्लार्क सुभाष शिवाजी यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप करत, सखोल चौकशीची मागणी केली आहे.
पाटील यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, संबंधित पदाधिकाऱ्यांनी आपला पदसत्ता वापरून त्यांच्या मुलाला नियमबाह्य पद्धतीने लाभ मिळवून दिला. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये अपंग व गरजू नागरिकांचा हक्क डावलण्यात आला असून, आर्थिक व प्रशासकीय स्तरावरही अपारदर्शकता आढळून आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
पाटील यांनी असेही सांगितले की, “मी ६२ टक्के अपंग असूनही माझ्या हक्कांना दुय्यम स्थान देण्यात आले. पदाधिकाऱ्यांनी केवळ सत्तेच्या जोरावर माझ्यावर अन्याय केला आहे. मी याविरोधात लढा सुरूच ठेवणार आहे.”
या प्रकरणी पाटील यांनी तालुका आणि जिल्हा प्रशासनाकडे लेखी स्वरूपात तक्रार सादर केली असून, दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, या तक्रारीनंतर गावात खळबळ उडाली असून, ग्रामस्थांतही संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. प्रशासन या प्रकरणाची दखल घेते का आणि चौकशीमध्ये काय निष्पन्न होते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागून राहिले आहे.