रिपोर्टर नूरखान
अमळनेर :- तालुक्यातील मारवड गावात गेल्या ३० वर्षांपासून बेघर प्लॉटमध्ये राहणाऱ्या एका अपंग नागरिकाला घरकुल योजनेअंतर्गत मंजूर झालेले अनुदान अडवून ठेवण्यात आले आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करूनही दुसरा धनादेश मिळालेला नाही. याउलट, स्थानिक ग्रामपंचायत सदस्यांकडून दावा करून त्याच्या घराच्या बांधकामात अडथळा निर्माण करण्यात येत असल्याचा आरोप सदर नागरिकाने केला आहे.
अपंग नागरिक यांनी सांगितले की, “मी ३० वर्षांपासून या प्लॉटवर राहतो आहे. घरपट्टी, पाणपट्टी आणि लाईट बिल मी नियमित भरत असून त्याचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. यंदा मला घरकुल मंजूर झाले असून मी घराचे बांधकाम सुरू केले आहे. मात्र, दुसरा हप्ता धनादेश अजून मिळालेला नाही. मी ग्रामसेवक, सरपंच आणि उपसरपंच यांच्याकडे वारंवार विनंती केली, तरी त्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे.”
यापेक्षाही गंभीर बाब म्हणजे, मारवड गावचेच ग्रामपंचायत सदस्य बाबुराव दौलत पाटील यांनी या घरावर खोटा दावा केला आहे की, “हे घर माझ्या मुलाच्या नावावर असून त्याचा हक्क आहे.” त्यानंतर त्यांनी संबंधित नागरिक व त्यांच्या कुटुंबाला धमक्या दिल्या असून पैशाची मागणीही केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
“मी एक अपंग असून मला कोणी आधार नाही. माझ्या कुटुंबात भीतीचं वातावरण आहे. मी केवळ सरकारने मंजूर केलेल्या योजनेचा लाभ घेतो आहे, तरीही मला त्रास दिला जातो आहे,” असंही संबंधित अपंग नागरिकाने नमूद केलं.
या प्रकरणाची चौकशी होऊन संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित कारवाई करून घरकुलाचा दुसरा हप्ता मंजूर करावा, तसेच संबंधित लोकप्रतिनिधींवर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.