रिपोर्टर नूरखान
अमळनेर :– अमळनेर तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून सुरु असलेल्या अनधिकृत शाळांवर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदने शासकीय अधिकाऱ्यांकडे वारंवार देऊनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे १७ सप्टेंबर २०२५ पासून पंचायत समिती, अमळनेर येथे आमरण उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती विश्वास दशरथ पाटील, अध्यक्ष – विश्वासराव पाटील बहुउद्देशीय संस्था, जानवे यांनी दिली.
तालुक्यात सुरुवातीला एकच अनधिकृत शाळा सुरू होती, मात्र सध्या अशा शाळांची संख्या तीनवर पोहोचली असून, त्या कोणत्याही प्रकारची मान्यता नसताना विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात घालत आहेत. शासकीय यंत्रणा याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.
“शासनाने शिक्षणाच्या गुणवत्तेबाबत सातत्याने बडेजावाच्या घोषणा केल्या, मात्र प्रत्यक्षात अनधिकृत शाळा बिनधास्त सुरू असतील, तर कायद्याने काम करणाऱ्या शाळांना कोणते प्रोत्साहन? पालकांची फसवणूक थांबवण्यासाठी आणि शिक्षणाचा दर्जा अबाधित ठेवण्यासाठी अशा शाळांवर त्वरित कारवाई झाली पाहिजे,” असे पाटील यांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रशासनाकडे उपोषणासाठी लेखी परवानगी मागितली असून, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.