रिपोर्टर नूरखान
अमळनेर : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिमुसळधार पावसामुळे शेतकरी पुरते हवालदिल झाले आहेत. मराठवाडा, विदर्भ तसेच पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूर आणि अतिवृष्टीमुळे लाखो हेक्टरवरील पिकांचे अपरिमित नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले पीक पाण्याखाली गेल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. नुकसानीचा आकडा वाढला.
प्राथमिक अंदाजानुसार, राज्यात जवळपास ७० ते ९२ लाख एकरपेक्षा अधिक शेतीचे नुकसान झाले असल्याची माहिती समोर येत आहे. यात विशेषत, सोयाबीन, कपाशी (कापूस) आणि तूर या खरीप पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेतातील उभी पिके पूर्णपणे सडून गेली असून, पुरामुळे शेतजमिनीची मातीसुद्धा वाहून गेल्याचे विदारक चित्र आहे. परभणी, नांदेड, बीड, सोलापूर धाराशिव,आणि जळगांव यांसारख्या जिल्ह्यांना या अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे.
पंचनाम्याचे काम सुरू.
नुकसानीची व्याप्ती मोठी असल्याने महसूल, ग्रामविकास आणि कृषी विभागामार्फत संयुक्त पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पंचनामे तातडीने पूर्ण करून नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी शेतकरी संघटना आणि राजकीय नेत्यांकडून होत आहे. अनेक ठिकाणी विमा कंपन्यांकडूनही भरपाई मिळण्याबाबत शेतकरी प्रश्न विचारत आहेत.
शासनाकडून मदतीचे आश्वासन.
राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत माहिती देताना, शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत २,२५० कोटी रुपयांची मदत वितरित करण्यात आल्याचे सांगितले आहे. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बाधित शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई देण्याचे आणि सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, विरोधी पक्षांनी मदतीची रक्कम तातडीने वाढवून पंचनाम्यात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर .
कारवाईची मागणी केली आहे.
नैसर्गिक संकटापुढे हताश झालेल्या शेतकऱ्यांसमोर आता कर्ज आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न उभा आहे. शासनाकडून मिळणारी मदत वेळेवर आणि पुरेशी असणे गरजेचे आहे, अन्यथा शेतकरी मोठ्या अडचणीत सापडतील.