रिपोर्टर नूरखान
अमळनेर :- अमळनेर तालुक्यातील मारवड महसूल मंडळातील कळमसरे व वासरे गावांमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी आज प्रशासनाच्या वतीने करण्यात आली. या पाहणीदरम्यान बाधित भागातील ग्रामस्थांशी संवाद साधण्यात आला.
या दौऱ्यात जिल्हा परिषद जळगावच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, तसेच गटविकास अधिकारी नरेंद्र पाटील उपस्थित होते.
श्रीमती करनवाल यांनी बाधित नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, “प्रशासन आपल्या नागरिकांसोबत सदैव उभे असून, नैसर्गिक आपत्तीमधून सावरण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.”
नुकसानग्रस्त कुटुंबांना तातडीची मदत, निवारा, अन्नधान्य आणि वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येत असून, नुकसान भरपाईसाठी पंचनामे सुरू आहेत.
या दौऱ्यामुळे ग्रामस्थांमध्ये दिलासा निर्माण झाला असून, प्रशासनाच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.