Malegaon – Waseem Raza Khan
बाजार समितीचे सभापती डॉ.अद्वय हिरे यांचे संचालकपद रद्द झाल्याने तर उप सभापती विनोद चव्हाण यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर रिक्त पदासाठी काल सोमवार दि.२० रोजी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. समितीत सत्तारुढ असलेल्या हिरे गटात बंडखोरी झाल्याने तब्बल २० महिन्यांच्या कालावधीनंतर सत्तांतर होऊन सभापतिपदी भुसे गटाचे चंद्रकांत शेवाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर हिरे गटाच्या बंडखोर संचालिका अरूणा सोनजकर यांची उपसभापती वर्णी लागली.
१८ संचालक असलेल्या बाजार समितीत हिरे गटाचे 14 संचालक निवडून आले होते. तर मंत्री दादा भुसे यांच्या पॅनलला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले होते.
तर बारा बलुतेदार मित्र मंडळाचा एक संचालक निवडून आला होता. हिरे गटाकडे बहुमत असल्याने अद्वय हिरे यांची समितीच्या सभापतीपदी तर अॅड. विनोद चव्हाण यांची उपसभापतिपदी बिनविरोध निवड झाली होती. दरम्यान सभापती हिरे यांना जिल्हा बँक फसवणूक प्रकरणी अटक झाल्याने त्यांनी नऊ महिने तुरुंगवास भोगला. हिरे यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर त्यांनी बाजार समितीत लक्ष घातले. यावेळी उपसभापती अॅड. चव्हाण यांनी पदाचा राजीनामा दिला. याच दरम्यान टेहरे येथील धर्मा शेवाळे यांनी उपनिबंधकांकडे हिरे हे बाजार समितीच्या सलग सात मासिक बैठकींना गैरहजर असल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यासंदर्भात तक्रार केली होती. त्यानुसार चौकशी होऊन जिल्हा उपनिबंधक फैयाज मुलाणी यांनी २३ डिसेंबरला हिरे यांचे संचालक पद रद्द केले होते. तर उपसभापती चव्हाण यांनी राजीनामा दिल्यामुळे या दोन्ही रिक्त जागांसाठी चांदवडच्या सहायक निबंधक सविता शेळके यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी बाजार समितीच्या सभागृहात निवड प्रक्रिया राबविण्यात आली. सभापतिपदासाठी शिवसेनेचे शेवाळे व उपसभापतिपदासाठी सोनजकर यांचा एकमेव अर्ज दाखल असल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडणूक प्रक्रियेत शेवाळे यांना सुचक म्हणून विनोद चव्हाण तर अनुमोदक म्हणून सुभाष सूर्यवंशी यांनी तर सोनजकर यांना मिनाक्षी देवरे सुचक तर रत्ना पगार या अनुमोदक होत्या. शेवाळे व सोनजकर यांच्या निवडीची घोषणा होताच शिवसैनिकांनी फटाक्यांची आतषबाजी करीत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी सचिव कमलेश पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकार्यांना सहकार्य केले. याप्रसंगी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
* तीन संचालक गैरहजर
१८ संचालक असलेल्या बाजार समितीत हिरे यांचे संचालकपद रद्द झाल्याने उर्वरित १७ संचालकांपैकी १४ संचालकांनी या निवडणूक प्रक्रियेत सहभाग नोंदविला. तर हिरे गटाचे नंदलाल शिरोळे, रवींद्र सूर्यवंशी व भारती बोरसे हे तीन संचालक बैठकीला गैरहजर होते. तर भुसे गटाचे चंद्रकांत शेवाळे, भिका कोतकर, संजय घोडके, रवींद्र साळुंके हे चार व हिरे गटाचे बंडखोर संचालक विनोद चव्हाण, संदीप पवार, सुभाष सूर्यवंशी, डॉ. उज्जेन इंगळे, रवींद्र मोरे, रवींद्र निकम, राजेंद्र पवार, अरुणा सोनजकर, मिनाक्षी देवरे, रत्ना पगार असे १४ संचालकांनी निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेतला.
* हिरेंच्या वर्चस्वाला धक्का
बाजार समितीत हिरे पॅनलला मिळाल्याने यशानंतर मंत्री दादा भुसे यांनी अद्वय हिरे यांचा दारुण पराभव केला होता. निवडणूक प्रचारादरम्यान भुसे यांनी अनेकवेळा बाजार समितीत सत्तांतर होणार असल्याचे भाकित केले होते. विधानसभा निवडणूक निकालानंतर हिरे यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने समितीच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात उलथापालथ झाल्याचे बघायला मिळाले. बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक घोषित होताच प्रारंभी हिरे गटाचे पाच संचालक मंत्री भुसे गटाला जाऊन मिळाले होते. तर निवडणुकीच्या दोन दिवसांपूर्वीच पुन्हा पाच संचालक हे भुसे गटाला जाऊन मिळाल्याने हिरेंच्या वर्चस्वाला मोठा धक्का बसला आहे. हिरे गटाचे १० संचालक भुसे गटाला जाऊन मिळाल्याने समितीवर पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकणार हे जवळपास निश्चित झाले होते.