jalgaon
महाराष्ट्र नाभिक साहित्य कलादर्पण संघाचे तृतीय साहित्य संमेलनात विविध सत्रात मांडणी
कलाविष्कार, कविसंमेलनासह समारोपीय सत्रात ६ ठराव मंजूर
जळगाव (प्रतिनिधी) : स्पर्धात्मक युगात शिक्षण महत्वाचे आहे. शिक्षणामुळे शिस्त, चारित्र्य निर्माण होते. समाजात महत्व मिळते. शैक्षणिक क्षेत्रात नाभिक समाजबांधवांनी गेले पाहिजे. साहित्याला शिक्षणाची आवश्यकता आहे. त्यामुळे साहित्य रचना उत्तम येते. तेव्हा नाभिक समाजातून उत्तम साहित्यिक घडतील, असे प्रतिपादन ग्रामीण विकास व पंचायत राज युनिव्हर्सिटी, गदग, कर्नाटकचे माजी कुलगुरू प्रा. डॉ. विष्णुकांत चटपल्ली यांनी केले.
महाराष्ट्र नाभिक साहित्य कलादर्पण संघाचे तृतीय साहित्य संमेलन कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या लेखणीने गंधित झालेल्या जळगाव शहरात शनिवार, दि.८ फेब्रुवारी रोजी साईलिला सभागृह, शिरसोली रोड येथे दिवसभरात घेण्यात आले. यावेळी प्रा. डॉ. चटपल्ली बोलत होते. यावेळी मंचावर तृतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लेखक तथा नाभिक मंच संपादक, धुळे येथील भगवान चित्ते, संमेलनाचे स्वागताध्यक्ष रविंद्र (बंटी) नेरपगारे (जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र नाभिक महामंडळ, जळगाव) सयाजी झुंजार (प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र नाभिक महामंडळ), महाराष्ट्र नाभिक साहित्य कलादर्पण संघाचे उपाध्यक्ष मुकुंद धजेकर उपस्थित होते. सुरुवातीला प्रा. डॉ. चटपल्ली व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.
प्रस्तावनेतून मुकुंद धंजेकर यांनी संमेलन घेण्यामागचा उद्देश स्पष्ट करून नाभिक समाजाच्या साहित्य चळवळीविषयी माहिती दिली. यानंतर सयाजी झुंजार, भगवान चित्ते यांनी मनोगत व्यक्त केले. मनोगतातून त्यांनी नाभिक समाजाचे साहित्य निर्माण होण्यासाठी करावयाच्या प्रयत्नांविषयी उहापोह केला. तसेच, साहित्यनिर्मितीसाठी पोषक वातावरण निर्माण करूया असे सांगितले. यानंतर प्रा. डॉ. चटपल्ली यांनी सांगितले की, समाजातील महापुरुषांबाबत सविस्तर माहिती अभ्यासक्रमात आली पाहिजे. साहित्य निर्मितीसाठी शिक्षण घेणे, वाचन करणे महत्वाचे आहे. युवा मंडळींना प्रोत्साहन देऊन लिहिते केले पाहिजे असेही डॉ. चटपल्ली म्हणाले.
सुत्रसंचालन प्रविण बोपुलकर, अश्वीनीताई अतकरे यांनी केले. संमेलन यशस्वीतेसाठी संजय सोनवणे, राजकुमार गवळी, संजय पवार, उदय पवार, चंद्रकांत शिंदे, उमाकांत निकम, सुनील बोरसे, सुधाकर सनन्से, अनिल शिंदे आदींनी परिश्रम घेतले.
प्रथम सत्रात मांडणी
संमेलनातील प्रथम सत्रात “सकल नाभिक समाजाच्या उन्नतीसाठी उद्याच्या सामाजिक व राजकीय दिशा” या विषयावर वक्त्यांनी मांडणी केली. यात अध्यक्षस्थानी गोपालकृष्ण मांडवकर होते. तर सोलापूर येथील किरण भांगे, जळगाव येथील हभप मनोहर खोंडे, डॉ. व्यंकटराव काळे यांनी विचार मांडले. युवकांनी राजकारणात सक्रिय सहभाग नोंदवला पाहिजे. नाभिक समाजातून वृत्तपत्र सुरु केले पाहिजे. केसशिल्पी महामंडळाच्या माध्यमातून नाभिक समाजातील साहित्य निर्मितीसाठी अर्थसहाय्य मिळायला हवे, असा सुरू या परिसंवादातून उमटला.
महिला परिसंवाद
दुसरा परिसंवाद महिलांसाठी असून ‘नाभिक समाजातील महिलांचे सबलीकरण’ या विषयावरील परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णाताई वाघमारे होत्या. यात निवृत्त शिक्षिका माया नंदुरकर, धुळे येथील डॉ. हर्षदा निंबा बोरसे, अलका सोनवणे यांचा सहभाग होता. नाभिक समाजातील महिलांचे सक्षमीकरण व एकीकरण बचतगटाच्या माध्यमातून करुन त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारली जाऊन स्वत: चा विकास साधता येईल. तसेच लघू उद्योग करुन स्वावलंबी बनता येते. महिलांना समाजात सन्मान प्राप्त करून देण्यासाठी आत्मसन्मान, अंतर्गत मजबुती आणि रचनात्मक विकासास कारणीभूत होतील असे महिला सक्षमीकरण कार्यक्रम सुरु केले पाहिजेत, असा सूर या परिसंवादात उमटला.
कविसंमेलन आणि कलाविष्कार
यानंतर कवीसंमेलन घेण्यात आले. यात महाराष्ट्रातील १६ कवींनी सहभाग घेतला. सूत्रसंचालन सर्जनशील शब्दवेल साहित्य मंच, पनवेलचे अध्यक्ष प्रवीण बोपुलकर यांनी केले. तत्पूर्वी, समाजातील लोककलावंतांच्या कलाविष्काराचा कार्यक्रम देखील सादर झाला. समाजातील गंभीर विषयांवर कवींनी भाष्य केले. समाजाला दिशा देण्यासाठी आवश्यक उपाययोजना याबाबत कवींनी सांगितले. यात प्रामुख्याने कवी आर.डी. वाघ भडगाव, कवयित्री सुवर्णो वाघमारे पुणे, अमरावती, पुणे येथील कवीचा समावेश होता.
संमेलनात ६ ठराव मंजूर
समारोपीय सत्रात महाराष्ट्र नाभिक साहित्य कलादर्पण संघाच्या कार्याचा आलेख आणि पुढील वाटचाल संघाचे अध्यक्ष शरद ढोबळे यांनी सांगितली. अध्यक्षांच्या उपस्थितीत ठराव घेऊन तिसऱ्या साहित्य संमेलनाचा समारोप झाला. या साहित्य संमेलनास राज्यभरातून १०० पेक्षा अधिक समाजबांधव उपस्थित होते. महाराष्ट्र सरकारने मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा प्रदान केला. याबद्दल महाराष्ट्र सरकारच्या अभिनंदन करण्याचा ठराव मंजूर झाला. नाभिक समाजातील साहित्यिकांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी राज्य सरकारने समाजातील साहित्यिकांना साहित्य निर्मितीसाठी प्रोत्साहन देण्याचा ठराव मंजूर झाला. महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाने महाराष्ट्र अधिक साहित्य कलादर्पण संघाद्वारे आयोजित साहित्य संमेलनासाठी अनुदान उपलब्ध करून देण्याचा ठराव मंजूर झाला. पुढील वर्षीपासून ‘नाभिक जीवन गौरव’ आणि ‘नाभिक साहित्य सेवा’ पुरस्कार तसेच महिला आणि युवा साहित्य गौरव पुरस्कार देण्याचा ठराव मांडण्यात आला. महाराष्ट्र नाभिक साहित्य महामंडळाकडून समाजातील युवक,युवती, विद्यार्थ्यांना लेखनाचे प्रोत्साहन मिळावे यासाठी शाळा-महाविद्यालयांमध्ये साहित्य विषयक उपक्रम राबविण्याचा ठराव मांडण्यात आला. महाराष्ट्र नाभिक साहित्य कलादर्पण संघाची धर्मदाय आयुक्त कार्यालयात नोंदणी करण्याचा ठराव करण्यात आला.