शिरपूर (वाहिद काकर ) — शिरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने रोहिणी शिवारातील जंगलात गुप्त माहितीच्या आधारे धाडसत्र राबवत एक मोठी कारवाई केली. या कारवाईत एकूण 70 लाख 70 हजार रुपये किंमतीचा, 1010 किलो वजनाचा गांजा अमली पदार्थ हस्तगत करण्यात आला असून, भाईदास जगतसिंग पावरा व बाटा अमरसिंग पावरा या दोघा इसमांना अटक करण्यात आली आहे.
गुप्त माहितीवरून पोलीस सतर्क
दिनांक 01 मे 2025 रोजी 13:30 वाजता, शिरपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना एक गुप्त बातमी मिळाली की, लाकडया हनुमान (ता. शिरपूर) येथील भाईदास पावरा नावाचा इसम रोहिणी शिवारात जंगलात गांजा लपवून ठेवत असून, त्याचे बाटा पावरा नावाचे साथीदार त्या गांज्याची देखरेख करत आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक मा. श्रीकांत धिवरे यांच्याशी संपर्क साधून मौखिक परवानगी घेण्यात आली.
जंगलात धाड – संशयित पळण्याचा प्रयत्न फोल
पोलीस पथक, शासकीय पंच, वजन काटा धारक व फोटोग्राफर यांच्यासह चारचाकी व दुचाकी वाहनांतून शिरपूरहून घटनास्थळी रवाना झाले. सुळे गाव मार्गे लाकडया हनुमानमार्गे रोहिणी शिवार या जंगल परिसरात पोहोचल्यावर दोघे संशयित पोलिसांना पाहून पळू लागले. मात्र तत्परतेने पाठलाग करून त्यांना ताब्यात घेण्यात आले.
खड्ड्यात लपवलेला गांजा उघडकीस
पोलिसांनी पंचासमक्ष त्यांची चौकशी केली असता, उडवाउडवीची उत्तरे दिली गेली. मात्र, अधिक चौकशीनंतर आणि गुप्त बातमीदाराच्या मार्गदर्शनाखाली पळसांच्या झाडांजवळ एक नवं मातीचं थर दिसला. जेसीबीच्या सहाय्याने जमीन उकरल्यावर त्या ठिकाणी पत्र्याच्या झाकणाखाली लपवलेल्या 34 पत्रटी कोठ्या सापडल्या. त्या कोठ्यांमध्ये प्रत्येकी 25 किलो वजनाच्या 40 गोण्या व एक 10 किलोची गोणी आढळली. सर्व गोण्या उग्र वास असलेल्या हिरवट रंगाच्या गांज्याने भरलेल्या होत्या.
गांज्याची एकूण किंमत आणि गुन्हा दाखल
प्रत्येक किलो गांज्याची बाजारभावानुसार किंमत 7000 रुपये इतकी असून, एकूण 1010 किलो गांजा जप्त करण्यात आला. त्याची एकूण किंमत 70,70,000 रुपये एवढी आहे.
याबाबत पोहेकॉ. चत्तरसिंग खसावद यांच्या फिर्यादीवरून एन.डी.पी.एस. कायदा 1985 चे कलम 8(क), 20(ब)(ii)(क) व 22(क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि पोलिसांची भूमिका
सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, व उपविभागीय अधिकारी श्री. सुनिल गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
कारवाईत पोनि जयपाल हिरे, पोसई सुनिल वसावे, पोसई मिलिंद पवार, आणि पोलीस अंमलदार संतोष पाटील, सागर ठाकूर, संदीप ठाकरे, रमेश माळी, अल्ताफबेग मिर्झा, धनराज गोपाळ, योगेश मोरे, सुनिल मोरे, संजय भोई, ग्यानसिंग पावरा, प्रकाश भिल, दिनकर पवार, वाला पुरोहित, रणजित वळवी, मनोज नेरकर, सागर कासार आदींनी सहभाग घेतला.
स्थानिकांमध्ये कौतुकाची लाट
पोलीस प्रशासनाच्या या धडक कारवाईचे स्थानिक नागरिकांतून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. जंगलात एवढ्या मोठ्या प्रमाणावर गांज्याचा साठा लपवून ठेवणे ही गंभीर बाब असून, अशा प्रकारच्या तस्करीमुळे समाजात अमली पदार्थांचे प्रमाण वाढण्याचा धोका वाढतो. ही कारवाई हे दाखवते की शिरपूर पोलीस दल सतर्क असून, गुन्हेगारीविरोधात सज्ज आहे.