रिपोर्टर नूरखान
अमळनेर – तालुक्यातील पांझरा नदीतून बेकायदेशीर वाळू उपसा सर्रासपणे सुरू असून, वावडे गाव परिसरात या प्रकाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. विशेष म्हणजे, स्थानिक तलाठी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
ग्रामस्थांच्या माहितीनुसार, वावडे गावाच्या हद्दीतून वाळूने भरलेले ट्रॅक्टर आणि डंपर मोठ्या प्रमाणावर वाहतूक करताना दिसत आहेत. पांझरा नदीपात्रातून वाळू काढून सर्रासपणे टप्पे मारले जात असून, हा उपसा पूर्णतः बेकायदेशीर आहे.
गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, वावडे गावचे तलाठी व वाळू माफियांमध्ये संगनमत असल्यामुळेच ही वाहतूक विनाअडथळा सुरू आहे. “तलाठी झोपेचे सोंग घेत आहेत की मुद्दाम दुर्लक्ष करत आहेत, याचा तपास प्रशासनाने करावा,” अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
या प्रकारामुळे नैसर्गिक संसाधनांची लूट होत असून, पर्यावरणावरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनाने त्वरित लक्ष घालून कारवाई करावी, अशी मागणी वावडे परिसरातील नागरिक करत आहेत.