रिपोर्टर नूरखान
अमळनेर :- आगामी अमळनेर नगरपरिषद निवडणुकीसाठी महायुतीसोबतच अमळनेरवर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन निवडणूक ताकदीने लढवण्याची भूमिका माजी मंत्री तथा आमदार अनिल भैय्यासाहेब पाटील यांनी स्पष्ट केली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या निवासस्थानी एक महत्वपूर्ण बैठक पार पडली, ज्यामध्ये अनेक माजी नगरसेवक व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण केली.
माजी आमदारांच्या गटाला धक्का, राष्ट्रवादीत शक्तिवृद्धी.
या बैठकीत माजी आमदारांच्या गटातील सलीम शेख (टोपी), फिरोज मिस्तरी, ऍड. सुरेश सोनवणे, नावेद शेख, नितेश लोहरे, इम्रान शेख, मुकेश बिऱ्हाडे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे माजी आमदारांच्या गटाला निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसला आहे, तर आमदार पाटील यांची संघटनात्मक ताकद वाढली आहे.
सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
बैठकीस माजी नगरसेवक, पदाधिकारी, विविध पक्षांतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जवळपास सर्वांनी ‘शहर विकास आघाडी’च्या माध्यमातून निवडणूक लढवावी, अशी जोरदार मागणी केली. उपस्थित कार्यकर्त्यांनी एकमुखाने आमदार पाटील यांचे नेतृत्व मान्य करत आगामी निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली एकजुटीने लढण्याचा निर्धार व्यक्त केला.
या वेळी मार्गदर्शन करताना आमदार पाटील म्हणाले की, “उमेदवारांनी भावनेने नव्हे तर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवावी. दुहेरी भूमिका असलेल्यांना संधी दिली जाणार नाही. इच्छुक उमेदवारांनी स्वतःचा प्रभागाचा अभ्यास केला पाहिजे. नसेल, तर उमेदवारीपासून दूर राहावं. मी स्वतः उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहे.”
तसेच त्यांनी सांगितले, “आपले नाव लोकांमधून पुढे यावे, लोकांचा पाठिंबा महत्त्वाचा आहे. सर्व जाती-धर्मांना सोबत घेणं ही आपली भूमिका आहे. निवडून आल्यावर भूमिकेपासून विचलित होऊ नये. बाहेरचे लोक दिशाभूल करतील, पण त्यांच्या जाळ्यात अडकू नका.”
एकत्रित नेतृत्व, विकासाचे व्हिजन.
“आपण सर्वजण मिळूनच या शहरासाठी काम करणार आहोत. अमळनेरचा माणूस, तीच आपली जात-धर्म आहे,” असे भावनिक आवाहनही पाटील यांनी उपस्थितांना केले. त्यांनी सूचित केलं की आगामी काळात भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना यांचे स्वतंत्र बैठका घेऊन अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
उपस्थित मान्यवर या बैठकीत माजी नगराध्यक्ष विनोदभैय्या पाटील, माजी उपनगराध्यक्ष मोहन सातपुते, विनोद लंबोळे, शहराध्यक्ष मुक्तार खाटीक, संजय पाटील, विक्रांत पाटील, चेतन राजपूत, कैलास पाटील, सलीम टोपी, शितल देशमुख, देवेंद्र कांबळे, महेश सातपुते, आरिफ पठाण, तुषार संदानशिव, संतोष लोहरे, अमित जैन यांच्यासह विविध पक्षांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन विनोद कदम यांनी केलं.