रिपोर्टर नूरखान
अमळनेर:- तालुक्यातील पिळोदे ग्रामपंचायतीत झालेल्या एक धक्कादायक प्रकारात, कार्यरत असताना मृत्युमुखी पडलेल्या ग्रामपंचायत कर्मचारी प्रकाश शिरसाट यांचा मुलगा मागील तीन ते चार वर्षांपासून अनुकंपा तत्वावर नोकरीसाठी अर्ज करीत आहे, मात्र आजतागायत त्याला नियुक्ती नाकारण्यात आली आहे. दरम्यान, ग्रामपंचायतीने दुसऱ्या एका व्यक्तीस तात्पुरत्या स्वरूपात कामावर घेतले असून, या प्रकारामुळे जातीय भेदभावाच्या आरोपांना उधाण आले आहे.
या अन्यायाविरोधात शिरसाट कुटुंब उपोषणास बसले असून, ग्रामपंचायतीने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. उलट, ग्रामपंचायतीच्या सरपंचांसह संपूर्ण कर्मचारी वर्गाने कार्यालयाला कुलूप लावून पलायन केल्याचे पाहायला मिळाले. या घटनेने परिसरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला न्याय नाकारला जातोय?
प्रकाश शिरसाट हे पिळोदे ग्रामपंचायतीत प्रामाणिकपणे सेवा बजावत असताना त्यांचे निधन झाले. कुटुंबाच्या उपजीविकेचा आधार हरपल्यानंतर, त्यांच्या मुलाने नियमानुसार अनुकंपा तत्वावर नोकरी मिळावी यासाठी ग्रामपंचायतीकडे वारंवार अर्ज केले. मात्र, या अर्जांना सातत्याने दुर्लक्ष करून इतर व्यक्तीस तात्पुरत्या स्वरूपात कामावर घेतले गेले. यामुळे सामाजिक व मानसिक अन्याय झाल्याचा आरोप शिरसाट कुटुंब करत आहे.
जातीय भेदभावाचा आरोप.
शिरसाट कुटुंब बौद्ध समाजातील असून, या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जातीय भेदभाव झाल्याचा आरोप स्थानिक समाजबांधवांकडून करण्यात येत आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष, आणि सत्ताधाऱ्यांची अनास्था यामुळे हा मुद्दा चिघळण्याची शक्यता आहे.समाजबांधव आक्रमक, आंदोलनाची तयारी. या प्रकारामुळे पिळोदे गावात तसेच अमळनेर तालुक्यात सामाजिक संघटनांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. समाजबांधवांनी एकत्र येत ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात निषेध व्यक्त केला असून, कुटुंबाला तात्काळ न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.अशी मागणी केली आहे.प्रकाश शिरसाट यांच्या मुलाला अनुकंपा तत्वावर त्वरित नोकरी द्यावी.नियुक्त प्रक्रियेमध्ये झालेल्या अनियमिततेची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी.उपोषणावर बसलेल्या कुटुंबाची तपासणी करून योग्य ती मदत तात्काळ पोचवावी.या प्रकारामुळे पिळोदे ग्रामपंचायत प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या घटनेची चौकशी करून संबंधितांना न्याय मिळावा, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.