Friday, March 21, 2025
Friday, March 21, 2025
Friday, March 21, 2025
spot_img
spot_img
A venture of Pen First Media and Entertainment Pvt. Ltd
Member of Working Journalist Media Council Registered by - Ministry of Information and and Broadcasting, Govt. Of India. New Delhi
HomeMarathiद स्टोरीटेलर: कला आणि बाजार यांच्यातील संघर्ष – कल्पना पांडे

द स्टोरीटेलर: कला आणि बाजार यांच्यातील संघर्ष – कल्पना पांडे

सत्यजित राय यांच्या लघुकथेवर आधारित “गल्पो बोलिये तरिणी खुरो,” आनंद महादेवन यांचा चित्रपट द स्टोरीटेलर (2025) हा खरी मेहनत आणि भांडवलदारीमधील संघर्ष याभोवती फिरतो. या चित्रपटात दोन पूर्णपणे वेगळ्या व्यक्तिमत्त्वांची कथा आहे: तारिणी बंद्योपाध्याय (परेश रावल) – एक वृद्ध बंगाली कथाकथनकार, ज्याच्या विचारांवर साम्यवादी तत्त्वज्ञानाचा प्रभाव आहे, आणि रतन गरोडिया (अदिल हुसेन) – एक श्रीमंत गुजराती व्यापारी, जो अनिद्रेमुळे अनेक वर्षांपासून झोपलेला नाही. त्यांच्या परस्परविरोधी जगांनी हे स्पष्ट केले आहे की, नफा मिळविण्याच्या हव्यासापोटी चालणाऱ्या व्यवस्थेत सर्जनशीलतेचा कसा शोषण केला जातो. हा चित्रपट केवळ मनोरंजन करत नाही, तर तो प्रश्न विचारतो – कथा कोणाची असते? श्रेय कोणाला मिळते? आणि सर्जक आपल्या सृजनशीलतेच्या शोषणाविरुद्ध कसा लढतो?

द स्टोरीटेलर मध्ये कला कशी वापरली जाते आणि चुकीच्या पद्धतीने कलाकाराचा फायदा उचलला जातो त्यावर आधारित आहे. तरिणी, बंगाली साहित्यिक परंपरांतून आलेला एक उत्कट कथाकथनकार, अहमदाबादमधील एका कपड्याच्या व्यापाऱ्याने – रतन गरोडियाने त्याला आपल्या अनिद्रेमुळे झोप येण्यासाठी कामावर ठेवतो. सुरुवातीला ही एक साधी सहज व्यवस्था वाटते, परंतु लवकरच रतनचा खरा स्वभाव उघड होतो. श्रीमंती असूनही, रतनला त्याच्या एका बुद्धिमान आणि सुसंस्कृत एकतर्फी प्रेम असलेल्या मैत्रिणीला– सरस्वतीला (रेवती) – पैशाने प्रभावित करता आले नाही. आपली छाप पाडण्यासाठी, तो तरिणीच्या नव्या दमाच्या, मौखिक कथांचा अपहार करून त्या स्वतःच्या गुज्जू गोर्की या टोपण नावाने छापून आणतो आणि लोकप्रिय अल्प काळातच प्रसिद्ध होतो. बौद्धिक चोरीचे हे कृत्य स्पष्टपणे दाखवते की भांडवलशाही व्यवस्था कशी सर्वसामान्य सर्जनशील लोक – घोस्टरायटर्स, कलाकार, आणि कामगारवर्गीय – यांच्या सृजनशीलतेचा नफा मिळवण्यासाठी वापर करते.

तरिणीला स्वतःच्या कथा लिहून प्रसिद्ध करण्याची भीती वाटते. त्याला अपयश, टीका, आणि पुस्तक न विकले जाण्याची चिंता असते. याचाच फायदा रतन घेतो. व्यवसायमनस्क आणि भांडवलशाही संधीसाधूपणाचे प्रतीक असलेल्या रतनने तरिणीच्या सहज स्फुरलेल्या कथांचा आपल्या नावाने उपयोग करून घेतला. ही चोरी फक्त कथानकाचा भाग नाही, तर ती भांडवलशाहीकडून श्रमिकवर्गाच्या मेहनतीचे आणि कल्पनाशक्तीचे शोषण कसे केले जाते, याचा ठळक दाखला आहे. श्रीमंत व्यापाऱ्याला या चोरीबद्दल कोणतीही नैतिक अपराधीपणाची भावना वाटत नाही. तो शांतपणे स्मित करून, तरिणीच्या सृजनशीलतेचा उपयोग स्वतःचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी करतो. सत्यजित राय यांच्या मूळ कथेचा हाच गाभा आहे – भांडवलशाहीकडून सामान्य माणसाच्या मेहनती आणि सृजनशीलतेचे होत असलेले शोषण.

द स्टोरीटेलर  मध्ये सामर्थ्यवान संस्कृती लोकल संस्कृतीवर कशी प्रभुत्व गाजवते ते दाखवले आहे. कोलकात्याची बंगाली संस्कृती आणि अहमदाबादची गुजराती संस्कृती यांची तुलना केली आहे. तारिणीच्या कोलकात्यात, परंपरा आणि जीवनाचा उल्लास आहे —मच्छी बाजार, ऐतिहासिक इमारती, आणि पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या कथा. इथे, कथा सांगणे हे “मालकी” नसून समुदायाची ठेवण आहे.

त्याउलट, अहमदाबादमधील रतनचा महल भांडवलशाहीच्या निर्ममतेचे प्रतिनिधित्व करतो. महागड्या फर्निचर, वाचनात न आलेल्या पुस्तकांनी भरलेल्या शेल्फ, पिकासोच्या प्रिंट्ससारखे कलाकृती — हे सर्व फक्त दंभ दाखवण्यासाठी. चित्रपट या “संस्कृती”वर टीका करतो, जिथे कला आणि कथांचा आत्मा हरवून त्या फक्त विक्रीसाठी पॅकेज केल्या जातात. भांडवलशाही विविध संस्कृतींना एकसारख्या बाजारू रूपात बदलते, त्यांची वैशिष्ट्ये नष्ट करते. शुद्ध शाकाहारी रतन, जो स्वतःच्या विरोधाभासी वर्तनासाठी ओळखला जातो, तो आपल्या नोकराला विचारतो, “तू माशांना खायला दिलं का?” — तारिणीला “मासेचे खाद्य” म्हणून संबोधताना तरिणीच्या कौशल्याला रतन कोणत्या नजरेने पाहतो ते दिसतं. कोलकात्याचा सामूहिक आनंद आणि अहमदाबादच्या महालाची रिकामटी हे या संघर्षाचे प्रतीक आहे.

या चित्रपटात, एक मांजर, मासे ज्याचे नैसर्गिक आवडते अन्न आहे. तिला नेहमी शाकाहारी खाण्यास भाग पाडले जाते. संधिमिळताच मांजर मालकाच्या फिश टाकीतून मासे चोरून खाऊन घेते. मांजराचा हा संघर्ष — नैसर्गिक इच्छा आणि समाजाचे नियम यांच्यातील ताण — हे एक रूपक आहे. शाकाहारी अन्न हे खाद्य पदार्थांच्या सांस्कृतिक दडपशाहीचे प्रतीक आहे, तर चोरीलेला मासा म्हणजे स्वतःची ओळख आणि स्वातंत्र्य. तारिणी, जो मांजराच्या स्वभावाला समजतो, त्याला मासे खाऊ घालतो. तो अहमदाबाद सोडताना मांजराला कोलकात्यात घेऊन जातो.

महिला पात्रे या चित्रपटात स्वतंत्र आणि बलवान दाखवल्या आहेत. विधवा सरस्वती (रेवती) हुशार आहे आणि तिचे स्वतःचे नैतिक मूल्य आहेत. ती त्या तत्त्वांवर ठाम राहते. रतनची चोरी कळल्यावर ती सांगते, “मी व्यापाऱ्याची तत्त्वे स्वीकारली असती, पण चोराची नाही,” आणि त्याला शुभेच्छा देऊन निघून जाते. तेव्हा धनाढ्य रतन कमजोर आणि असहाय्य दिसतो. सरस्वती भौतिक संपत्तीपेक्षा ज्ञान आणि बुद्धीला महत्त्व देते. ग्रंथपाल सुझी (तनिष्ठा चॅटर्जी) देखील आत्मविश्वासू म्हणून दाखवली आहे आणि तिचाही जगाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन आहे. तारिणीच्या दिवंगत पत्नीची आठवण, जिने त्याला लिहिण्यासाठी पेन दिली होती, ती देखील प्रेरणेचा एक कायमचा स्रोत बनते, कला आणि सर्जनशीलतेवर महिलांचा प्रभाव किती शक्तिशाली आहे यावर प्रकाश टाकते. या महिला जुन्या साहित्यातील दयनीय व्यक्तिरेखा नाहीत तर सत्यजित रे यांच्या प्रगतीशील दृष्टिकोनातून निर्माण झालेल्या मजबूत पात्र आहेत, ज्यामुळे कथेला एक समृद्ध, सकारात्मक आयाम मिळतो.

आधुनिक चित्रपटांच्या वेगवान गतीपेक्षा वेगळे, द स्टोरीटेलर प्रेक्षकांना मानवी जीवनाचा वेग कमी करण्यास आणि त्याचा आस्वाद घेण्यास आमंत्रित करते. महादेवन जाणूनबुजून मंद, विचारशील गती वापरतात, तर अल्फोन्स रॉयची सुंदर छायांकन शैली कोलकात्यातील हाताने ओढलेल्या रिक्षा आणि अहमदाबादमधील भव्य संगमरवरी इमारतींसारखी जुनाट दृश्ये टिपते. ही शांत, जवळजवळ ध्यानधारणा करणारी शैली आजच्या जलद कट आणि चमकदार संपादनापेक्षा खूप वेगळी आहे. एक चिंतनशील आणि तल्लीन करणारा अनुभव देऊन, चित्रपट हळूहळू तयार होणाऱ्या कलेच्या चिरस्थायी शक्तीवर भर देतो. ते आपल्याला शिकवते की खऱ्या कलेला वेळ लागतो – ही एक प्रक्रिया आहे जी घाईघाईने करता येत नाही परंतु त्यासाठी संयम, त्याग आणि धैर्य आवश्यक आहे. जीवन आणि कथेचे सार खरोखर समजून घेण्यासाठी, नैसर्गिक संथपणा आणि चिंतन करण्यासाठी वेळ काढणे ही कलेची खरी ताकद आहे.

चित्रपटाचा प्रभाव त्याच्या मुख्य कलाकारांमुळे आणखी वाढतो. परेश रावल तारिणीच्या भूमिकेत दमदार अभिनय करतात. जेव्हा तारिणीला रतनची फसवणूक कळते तेव्हा तो विचारपूर्वक आणि शांतपणे तीन ते चार महिने त्याच्या घरी राहून त्याला धडा शिकवतात. तारिणी बंड करतात आणि फसवणुकीचा प्रतिकार करतात. सामान्य माणूस असूनही तरिणिकडे वेळ देणारे, जिव्हाळा असलेले आणि गप्पा कळली करणारे कॉम्रेड सहकरी मित्र असतात तर दुसरीकडे, रतन एका एकाकी श्रीमंत माणसाच्या भूमिकेत दिसतो. आदिल हुसेन रतन गरोडिया या स्वतःच्या असुरक्षिततेत अडकलेल्या भांडवलदाराची भूमिका चांगली केली आहे.

द स्टोरीटेलर हा केवळ सत्यजित रे यांच्या क्लासिकचे पुनरुच्चार नाही – तो आपल्याला नफ्याने चालणाऱ्या समाजात कलेच्या भूमिकेचा पुनर्विचार करण्यास भाग पाडतो. हा चित्रपट दाखवतो की भांडवलशाही व्यवस्था सर्जनशील कार्याचे शोषण कसे करते आणि त्याचे अवमूल्यन कसे करते. कलात्मक प्रामाणिकता भांडवलशाहीच्या दबावांना टक्कर देऊ शकते. अखेरीस, तारिणी आणि रतन एकमेकांच्या कथा लिहायला सुरुवात करतात. तारिणी स्वतःच्या बौद्धिक मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी लिहितो, तर रतनही लिहू लागतो. दोघेही बदलतात, पण शेवट आदर्शवादी वाटतो.

जेव्हा तारिणी शेवटी आपली ओळख प्रस्थापित करण्यासाठी त्याच्या कथा लिहू लागते, तेव्हा तो त्याच्या सर्जनशीलतेवर नियंत्रण मिळविण्यासाठी पावले उचलतो. हा चित्रपट या संघर्षाबद्दल आहे. जेव्हा तारिणी विनोदीपणे म्हणते की, “कॉपी करण्यासाठी देखील मेंदूची आवश्यकता असते,” तेव्हा तो अशा जगाची थट्टा करतो जिथे कल्पना चोरणे त्या निर्माण करण्यापेक्षा सोपे असते. द स्टोरीटेलर ही बाजारातून सर्जनशीलता परत मिळवण्याची आणि कठोर परिश्रम करणाऱ्यांना न्याय देण्याची कथा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular