रिपोर्टर नूरखान
अमळनेर :- स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत करण्यात आलेल्या कामाच्या अहवालासाठी लाच मागणाऱ्या अमळनेर येथील ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागाचे उपविभागीय अधिकारी दिलीप दत्तात्रय पाटील यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव यांच्या पथकाने ४,००० रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली.
तक्रारदार हे खासगी ठेकेदार असून त्यांनी मौजे व मजरे हिंगोणे, ता. चोपडा येथे सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाचे ३ लाख ५५ हजार रुपयांचे काम पूर्ण केले होते. सदर कामाचा अहवाल तयार करून देण्यासाठी उपविभागीय अधिकारी दिलीप पाटील यांनी बिलाच्या २ टक्के म्हणजेच ७,००० रुपये लाचेची मागणी केली होती.
तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत दिनांक १५ ऑक्टोबर २०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव येथे लेखी तक्रार दाखल केली. त्यानुसार विभागाने तत्काळ कारवाई करत पंचासमक्ष पडताळणी केली. पडताळणीत आरोपी अधिकारी यांनी तडजोड करून ४,००० रुपये लाच घेण्याची तयारी दर्शवली.
त्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दिनांक १५ ऑक्टोबर रोजी सापळा कारवाई करत आरोपी पाटील यांना ४,००० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.
या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. २०२५, भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई योगेश ठाकूर, पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी रेश्मा अवतारे, पोलीस निरीक्षक, नंदुरबार व त्यांच्या पथकाने केली. यामध्ये सफौ. विलास पाटील, पोहेकॉ. नरेंद्र पाटील, पोना. हेमंतकुमार महाले व पोकॉ. राकेश दुसाने यांनी सहभाग घेतला.
सदर कारवाईस पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व सुनील दोरगे यांचे मार्गदर्शन लाभले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, सरकारी कर्मचाऱ्यांकडून लाच मागितली गेल्यास तत्काळ विभागाशी संपर्क साधावा.