wahid kakar Dhule 9421532266
धुळे जिल्ह्यातील ताजपुरी शिवारात रविवारी पहाटेच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. कुत्र्याने माशाची भाजी खाल्ल्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून मुलाने आपल्या आईचा लाकडी दांडक्याने मारहाण करून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपी अवलेस रेबला पावरा (वय २५, रा. खैरखुटी, ता. शिरपूर) यास थाळनेर पोलिसांनी अवघ्या चार तासांत अटकेत घेतले.
दिनांक २५ मे २०२५ रोजी पहाटे ५.३० च्या सुमारास ताजपुरी गावचे पोलीस पाटील यांनी थाळनेर पोलिसांना माहिती दिली की, ताजपुरीतील देविसिंग चौधरी यांच्या गोठ्यात काम करणाऱ्या व तेथेच वास्तव्यास असलेल्या तरुणाने त्याच्या आईचा खून केला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, मृत टापीबाई रेबला पावरा (वय ६७) या रक्ताच्या थारोळ्यात आढळून आल्या. त्यांचा नातू निखील पावरा याने दिलेल्या माहितीनुसार, रात्रीच्या जेवणासाठी तयार केलेली माशाची भाजी कुत्र्याने खाल्ल्याने झालेल्या वादातून आरोपीने आईवर लाकडी दांडक्याने हल्ला केला होता.
पोलिसांनी मृतदेह ग्रामीण रुग्णालय, थाळनेर येथे शवविच्छेदनासाठी पाठवला असून आरोपी अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून फरार झाला होता. पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चार पथके तयार करण्यात आली होती. अखेर आरोपी आढे शिवारातील केळीच्या शेतात लपलेला आढळून आला. पोलिसांनी चारही बाजूंनी घेराव घालून त्याला ताब्यात घेतले.
थाळनेर पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात IPC कलम १०३(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास चालू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.