धुळे: ढंढाणे फाट्याजवळील एका पेट्रोल पंपाजवळ अवैधरित्या ओव्हरलोड गौण खनिज वाळू वाहतूक करणारा टिपर पकडण्यात आला. मात्र काही मिनिटांतच सगळी धुरा आटोपली आणि टिपर जणू आरटीओ गाडीच्या संरक्षणात दिमाखात महामार्गावरून निघून गेला. या प्रकारामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणावर अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक सुरू असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली जात आहे. अवैध धंदे करणाऱ्यांचे ‘चांगभलं’ होत असून, कायदा आणि नियमांचे उल्लंघन बिनधास्तपणे सुरू असल्याचे दिसत आहे.
अवैध वाळू वाहतुकीच्या अशाच एका प्रकरणात महसूल विभागाने पाठलाग करून एक ट्रॅक्टर-ट्रॉली जप्त केली होती. मात्र चालक फरार झाला. पंचनामा करून ट्रॉली ग्रामीण तहसील कार्यालयाच्या आवारात (बारा फाट्यावर) लावण्यात आली. मात्र, काही तासांतच ती ट्रॉली चोरट्यांनी पळवून नेली. या प्रकारामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि तालुका पोलीस ठाण्याच्या सुरक्षित परिसरातही अवैध धंदेवाल्यांचे धाडस वाढल्याचे दिसत आहे.
गेल्या काही वर्षांपूर्वी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या कार्यकाळात, त्यांच्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी अवधान टोल नाका आणि चाळीसगाव रोडवर मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक करणारे टिप्पर जप्त केले होते. ते टिप्पर औद्योगिक वसाहतीत लावून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आली होती. मात्र, सध्या प्रशासनाकडून अशा अवैध वाहतुकीकडे डोळेझाक केली जात असल्याचा आरोप होत आहे.
जिल्ह्यातील नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते या परिस्थितीबाबत संतप्त असून, जिल्हा प्रशासन आता काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीला आळा घालण्यासाठी प्रशासन ठोस कारवाई करणार का, याची उत्सुकता आहे.