रिपोर्टर नूरखान
वाळू माफिया मोकाट! सरकारी कामात अडथळा, चोरी, धमक्यांचे गंभीर गुन्हे दाखल असूनही अमळनेर पोलिसांकडून आरोपींना ‘अभय’
अमळनेर :- महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांवर हल्ला करणे, सरकारी कामात अडथळा आणणे, वाळू चोरी करणे आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी देणे अशा गंभीर आरोपांखाली गुन्हे दाखल असलेल्या वाळू माफियांना अमळनेर पोलीस अद्याप अटक करत नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. आरोपी दिवसाढवळ्या शहरात मोकाट फिरत असून, त्यांनी तलाठी आणि महसूल कर्मचाऱ्यांवर पुन्हा प्राणघातक हल्ला करण्याची भीती व्यक्त होत आहे.
गंभीर गुन्हे दाखल, तरीही आरोपींनवर कारवाई नाही.
अमळनेर तालुक्यातील एका ताज्या घटनेत, वाळू तस्करांवर भारतीय दंड संहिता कलम 186, 353 , 504 , 506 आणि 379 अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही सर्व कलमे आरोपींच्या गुन्हेगारी प्रवृत्ती आणि सरकारी यंत्रणेला आव्हान देण्याचे दर्शवतात.
गुन्हा दाखल होऊनही अनेक दिवस उलटून गेले आहेत, तरीही अमळनेर पोलीस स्टेशनकडून संबंधित आरोपींना अटक करण्यासाठी कोणतीही तातडीची पाऊले उचलली जात नसल्याचे चित्र आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमळनेर शहर आणि परिसरात खुलेआम फिरताना दिसत आहेत.तलाठ्यांच्या जीवाला धोका
अटक न झाल्यामुळे या वाळू माफियांमध्ये कायद्याचा कोणताही धाक उरलेला नाही. ज्या तलाठी किंवा महसूल कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अवैध कृत्यांविरोधात आवाज उठवला, त्यांच्यावर पुन्हा हल्ला होण्याची किंवा त्यांना गंभीर दुखापत पोहोचवण्याची शक्यता आहे. यापूर्वी अनेक ठिकाणी वाळू माफियांनी सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ले केल्याच्या घटना ताज्या असताना, अमळनेर पोलिसांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे महसूल कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह.
गंभीर गुन्हे दाखल असूनही आरोपींना अटक का केली जात नाही, यावरून पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणामागे राजकीय दबाव आहे,की पोलिसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष? असा सवाल आता स्थानिक नागरिक विचारत आहेत.
सामाजिक कार्यकर्त्यांनी तातडीने जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणात लक्ष घालून आरोपींना त्वरित अटक करावी आणि भविष्यात महसूल कर्मचाऱ्यांवर होणारे संभाव्य प्राणघातक हल्ले टाळण्यासाठी सुरक्षिततेची हमी द्यावी, अशी मागणी केली आहे.