रिपोर्टर नूरखान
अमळनेर : तालुक्यातील एकरुखी येथे दि. २५/०९/२०२५ रोजी झालेल्या एका भीषण अपघातात, येथील मयत विश्वनाथ हिम्मत भिल आणि त्यांच्या पत्नी कै. ज्योतिबाई विश्वनाथ भिल या दाम्पत्याचा दुर्दैवी अंत झाला. या अपघातामुळे भिल कुटुंबावर मोठे संकट कोसळले असून, त्यांचे ६, ४ आणि २ वर्षांचे असे तीन लहान चिमुकले एका क्षणात अनाथ झाले आहेत. आई-वडिलांचे छत्र हरवल्याने या निष्पाप बालकांचे भविष्य अंधकारमय झाले असून, संपूर्ण पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.
बंजारा समाजाकडून मदतीचा हात. या हृदयद्रावक घटनेची माहिती मिळताच, परिसरातील सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या नागरिकांनी मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. मौजे ढेकु तांडा येथील बंजारा समाज बांधवांनी या दुर्दैवी घटनेची त्वरित दखल घेतली.
आज दि. २९/०९/२०२५ रोजी बंजारा समाज बांधवांनी एकरुखी येथे जाऊन या तिन्ही चिमुकल्यांची भेट घेतली. त्यांची विचारपूस करून सांत्वन केले. केवळ भावनिक आधार न देता, समाजाच्या वतीने त्यांना छोट्या स्वरूपाची आर्थिक मदत त्वरित सुपूर्द करण्यात आली.
योजना मिळवून देण्यासाठी करणार सहकार्य.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ढेकु तांडा येथील समाजबांधवांनी या मुलांसाठी शासनाच्या विविध योजनांचे लाभ बाल संगोपन योजना, निराधार योजना मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आणि त्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे.
एका बाजूला कुटुंबावर कोसळलेले हे दुर्दैवी संकट, तर दुसऱ्या बाजूला बंजारा समाज बांधवांनी दाखवलेली ही सामाजिक आपुलकी आणि माणुसकी इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. या मुलांना भविष्यात मदत करण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी पुढे येण्याची गरज आहे.